खबरदार ! वाहनांवर जातीसूचक शब्दांचा वापर केल्यास….

लखनऊ : वृत्तसंस्था – जर तुमच्या बाईकवर किंवा गाडीवर एखादी जातीसूचक शब्द लिहिलेला असले तर तात्काळ हटवा, अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होई शकते. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारनं जाति सूचक शब्दांविरोधात कडक कारवाई करण्याच्या धोरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे गाडीवर खान, यादव, क्षत्रिय, पंडित, राजपत, मौर्य, जाट या सारख्या जातिसूचक शब्दांचा वापर केला तर ट्रॅफिक पोलिस तुमच्यावर कारवाई करु शकतात. एवढेच नाही तर तुमचे वाहन जप्त ही केले जाऊ शकते.

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची नंबर प्लेट चुकीच्या आकाराची आणि आकडे आडवे-तिडवे लिहिलेले आढळले तर पाच हजार दंड भरावा लागेल. जातिसूचक शब्द लिहिलेले आढळून आल्यास आरोपीवर कलम 177 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या गुन्ह्यास 500 रुपये आणि दुसऱ्यांदा आढळून आल्यास 1500 दंड आकरण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि सामाजिक व्यवस्थेत जातीय समीकरणं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. यासंदर्भात केंद्र सरकारला वारंवार तक्रारी मिळाल्या आहेत. गाड्यांवर जातीवाचक उल्लेखामुळे उत्तर प्रदेशात गाड्यांवर जातीय वाद वाढत असल्याचा आरोपही होत होता. आपली जात वरिष्ठ आणि इतरांची जात कनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत होता. याच आधारावर पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर प्रदेश सरकारला एक पत्र लिहून यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. सभ्य समाजासाठी या पद्धतीची भाषा योग्य नसल्याचेही यात म्हटले होते.

पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र मिळताच उत्तर प्रदेश सरकारने गाड्या जप्त करण्यासोबत इतर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकांमध्ये यासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी एक मोहिम सरकारकडून चालवली जाऊ शकते. किंबहुना मोटार वाहन कायद्यानुसार, गाडीच्या नंबर प्लेटवर नंबर शिवाय आणखी काही लिहिलेलं आढळून आल्यास अशा गाड्यांविरोधात आणि त्या गाडी मालकाविरोधात कारवाई होऊ शकते.