Video : पुरस्कार कार्यक्रमाचे शक्तिप्रदर्शन नडले ! गॅंगस्टर शरद मोहोळसह 5 जणांना अटक; ‘हा’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानं आला ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर मध्यवतीत एका कार्यक्रमाला हजेरी लावताना केलेले शक्तीप्रदर्शन गॅंगस्टर शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांना भोवले आहे. शरद मोहोळसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शरद हिरामण मोहोळ (वय 38), विश्वास बाजीराव मनेरे (वय 37), मनोज चंद्रकांत पवार (वय 42) स्वप्निल अरुण नाईक (वय 35) योगेश भालचंद्र (वय 40) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अक्षय भालेराव, सिताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह दहा ते बारा जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कातील सिद्धीकी याच्या खूनप्रकरणात निर्देश सुटका झाल्यानंतर शरद मोहोळ येरवडा कारागृहातून बाहेर आला. यानंतर त्याला एका संघटनेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तसेच त्या संघटनेचा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला होता. संघटनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गॅंगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे दहा ते बारा साथीदार त्या ठिकाणी आले होते. Covid-19 अनुषंगाने जमाबंदी आदेश असतानाही आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून आरडाओरडा करत गुरुवार पेठेत दहशत निर्माण केली होती. तसेच, त्यांचा आरडाओरडा आणि गोंधळ यामुळे नागरिक घाबरून पळाले, असे देखील या फिर्यादीत म्हंटले आहे.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, शरद मोहोळ आणि त्याच्या काही विश्वासू साथीदारांनी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचा व्हिडीओ सोशलवर झपाटयाने व्हायरल झाला. त्यामुळं शरद मोहोळ आणि त्याचे साथीदार गोत्यात आले आहेत.