Video : मुलास वाचवणार्‍या पॉईंटमॅनसाठी वाजल्या टाळ्या, रेल्वे मंत्रालयाने दिले 50 हजारांचे बक्षीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   मुंबई डिव्हिजनच्या वांगणी रेल्वे स्टेशनवर रूळावर पडलेल्या मुलाचा जीव वाचवणारे पॉईंटमॅन मयूर शेळके यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे. स्वता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी त्यांना फोन करून आभार व्यक्त केले. यासोबतच मुंबईत सेंट्रल रेल्वे ऑफिसच्या संपूर्ण स्टाफने टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान केला.

यासोबतच रेल्वे मंत्रालयाने मयूर शेळके यांच्या या धाडसासाठी त्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. या संपूर्ण घटनेवर मयूर शेळके यांनी सांगितले की, ती महिला डोळ्यांनी कमजोर होती. ती काहीच करू शकत नव्हती. मी मुलाकडे धावलो परंतु माझ्या मनात हे सुद्धा होते की माझा जीव धोक्यात आहे. मात्र, मी हा सुद्धा विचार केला होता की, मला त्याला वाचवायचे आहे. महिला खुप भावनिक झाली होती. तिने माझे आभार मानले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुद्धा मला फोन केला होता.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, महाराष्ट्राच्या वांगणी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर शनिवारी रूळावर एक मुलगा आपल्या आईसोबत आहे. याच वेळी त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नाही, आणि आई खाली उतरू शकत नाही.

याच वेळी रूळावर एक नॉन स्टॉप ट्रेन येताना दिसते. हे सर्व पाहून प्लॅटफॉर्मवर असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडते. तेव्हा रूळावर असलेले पॉईंट्समॅन मयूर धावत येऊन मुला जवळ पोहचतात आणि त्यास उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवतात. नंतर स्वता वर चढतात. ते वर चढताच रूळावरून वेगवान ट्रेन धडघडत निघून जाते.

त्यांचा आणि मुलाचा जीव वाचतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या धाडसाचे कौतूक होत आहे.