पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Wadettiwar | राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा केंद्रस्थानी आहे. जालन्यामध्ये उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी 17 दिवस तीव्र उपोषण करुन मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची समजूत काढली आणि आरक्षणाच्या बाबतीत त्यांना आश्वस्त केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून ज्युस घेऊन अखेर उपोषण सोडले. सर्व माध्यमातून मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांचे कौतुक केले जात आहे. उपोषण सोडल्यानंतर विधानसभेचे विरोधपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना उपोषण सोडवणे आणि आंदोलन संपुष्टात आणणे एवढेच काम शिल्लक असल्याचा टोला लगावला आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “जो व्यक्ती (जरांगे) समाजासाठी काम करतो, त्याकडे सरकारने आधीच लक्ष द्यायला हवे होते. त्यामुळे सरकारने उपोषण सोडवले असले तरी त्यात उशीर झाला आहे. जशी उपोषण सोडवण्याची जबाबदारी सरकारची होती तशीच आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारची आहे आणि ती जबाबदारी सरकारने लवकर निभवायला हवी.” असे मत त्यांनी मांडले आहे.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) देखील मुद्दा प्रतिक्रिया देताना
मांडला. ते म्हणाले की, “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजामध्ये
प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे या ओबीसी समाजालाही मुख्यमंत्र्यांनी विश्वास देण्याची आवश्यकता आहे.
आम्ही मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितले पाहिजे. तसेच जिथे जिथे ओबीसी उपोषणावर बसले आहेत, तिथेही मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचे उपोषण सोडवावे. कारण सरकारला आता उपोषण सोडवणे आणि आंदोलन संपुष्टात आणणे एवढेच काम शिल्लक आहे अशा खोचक शब्दांमध्ये वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे देखील वडेट्टीवार म्हणाले.
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिष्टाई करायला फक्त शिंदे गटाचे आणि भाजपचे मंत्रीच गेले अजित पवार
गटाचे (Ajit Pawar Group) कोणीही गेले नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणापासून अजित पवार गटावर लांब का
या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमध्ये समन्वय नाही. या सरकारमध्ये सब कुछ आलबेल आहे यावर प्रश्नचिन्ह आहे. निवडणुकीला पाच ते आठ महिने शिल्लक आहेत.
या कालावधीत मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देतात की निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा लोकांच्या तोंडाला पाने
पुसतात हे लवकरच स्पष्ट होईल. या काळात सरकार आरक्षण देऊ शकले, तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील,
अन्यथा लोक सर्व काही पाहत आहेत.” असा घणाघात विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा