ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकेत हिंसाचार, PM मोदी म्हणाले – ‘सत्तांतर शांततेत व्हायला हवे…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटल इमारतीत घुसले आणि तोडफोड करण्यास सुरु केली. तेव्हा आंदोलक आणि पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला, तर अन्य कारणाने तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, यावरती भाष्य करताना हिंसाचाराच्या बातम्या पाहून आपण अस्वस्थ झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदीजी ट्विट करत म्हणाले, “वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगल आणि हिंसाचाराबाबतच्या बातम्या पाहून अस्वस्थ झाले. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण व्हायला पाहिजे. बेकायदेशीर निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही.”

अमेरिका संसद परिषदेच्या बैठकीत जो बायडेन यांच्या विजयची घोषणा केली जाणार होती. मात्र, तेव्हाच ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, त्या कारणाने संसदेचे कामकाज थांबवावे लागले. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळ केला. या घटनेवरती जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

शांतात राखण्याचे ट्रम्प यांचे आवाहन

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करत म्हणाले, आंदोलनात कोणताही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेच्या पक्षात आहोत.

… हा देशद्रोह आहे – जो बायडेन

नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. बायडेन म्हणाले, “मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तातडीने राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी व हे सर्व थांबवावे.” त्याचसोबत, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी म्हटले.