काॅंग्रेसकडून विश्वजीत कदम यांना उमेदवारी

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन
काॅंग्रेसचे जेष्ठ नेते डाॅ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेसाठी काॅंग्रेसच्या वतीने पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने देशातील चार लोकसभा आणि दहा राज्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.  त्यात पलूस-कडेगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.  पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघात 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार पुरूष मतदार 1 लाख 35 हजार 663 तर स्त्री मतदार 1 लाख 29 हजार 635 असून अन्य मतदार 3, असे एकूण मतदार संघात 2 लाख 65 हजार 301 मतदारांची संख्या आहे.
येणाऱ्या काळात होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून,  2 लाख 63 हजार 704 मतदान ओळखपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पलुस कडेगाव मतदारसंघात 282 मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचारी नेमणूक आणि आवश्यक वाहनांचे अधिग्रहण पुरेशा प्रमाणात करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कडेगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख असणार आहेत.
या निवडणूकी दरम्यान  कडेगावच्या तहसीलदार अर्चना शेटे आणि पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणूक प्रक्रिया 2 जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.