सूर्यवंशी चित्रपटाचा ‘तो’ अभिनेता ज्यानं एका दिवसाला केलं 20 तासांपर्यंत काम, तणावामुळे गळाले केस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अक्षय कुमारचा आगामी चित्रपट सूर्यवंशी संदर्भात जोरदार चर्चा रंगली आहे. रोहित शेट्टीचा हा मेगा बजेट चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी ते मार्च या काळात प्रदर्शित होणार आहे. अक्षय व्यतिरिक्त आणखीही अनेक कलाकार या चित्रपटात काम करत आहेत, त्यांची मेहनत जाणून घेतल्यास आपणास आश्चर्य वाटेल. असेच एक कलाकार आहेत ते म्हणजे विवान भटेना.

विवान भटेना, अक्षय कुमार सोबत सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु ते एक महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. विवान टीव्ही आणि चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बर्‍याच वर्षांपासून परिश्रम करून त्यांनी इतकी लोकप्रियता मिळविली आहे. परंतु त्यांच्या आयुष्यात देखील असे प्रसंग आले आहेत जेव्हा त्यांनी एका दिवसात 20 तासांपर्यंत काम केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सूर्यवंशीच्या या अभिनेत्याने आपल्या संघर्षाविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, माझे वडील गेल्यानंतर आमच्या डोक्यावर बरेच कर्ज होते. माझ्या खात्यात फक्त 600 रुपये असायचे. मी ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’ मध्ये काम केले. कठोर परिश्रम घेतले, परंतु जास्त पैसे मिळाले नाहीत.

अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवला, ज्यामुळे त्यांनी केवळ एका वर्षामध्येच सर्व कर्ज फेडले. पण यानंतरही ते आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी सतत मेहनत करत राहिले. विवानच्या म्हणण्यानुसार त्यांनी एका दिवसात 20-20 तासांपर्यंत शूट केले आहे. ते सतत काम करत असायचे. ते इतक्या तणावाखाली आले होते की, अगदी त्यांचे केस देखील गळू लागले होते. तेव्हा ते केवळ पैशासाठी काम करीत होते. एकूणच ते एक यंत्र बनले होते.

पण आता त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस संपले आहेत. ते सिरियलमध्येही काम करत आहेत आणि चित्रपटांतून देखील आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकत आहेत. विवानने आमिर खानपासून शाहरुख खानपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या सेलिब्रिटींबरोबर काम केले आहे. त्यांच्या कारकीर्दीबद्दल बघितले तर त्यांनी चक दे इंडिया, तलाश, जुडवा 2 यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्येही ते सर्वांना चकित करण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे.