मेलबर्न कसोटीत पुजाराने मोडले अनेक विक्रम ; भारत मजबूत स्थितीत

मेलबर्न :  वृत्तसंस्था –  मेलबर्न क्रिकेट मैदानावर तिसऱ्या  कसोटीत भारतीय  संघ मजबूत स्थितीत असून बॉकसिंग डे कसोटी सामना जिंकण्याची सुवर्ण संधी भारतीय टीमकडे आहे. भारतीय फलंदाजांनी आपली भूमिका चोक बजावत  ७ बाद ४४३ धावांवर आपला डाव घोषित केला. फलंदाजांनी चांगली  कामगिरी केली असली तरी या सगळ्यात चेतेश्वर पुजाऱ्याने उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीचे १७ वे शतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावे केले.
सलग दुसऱ्या दिवसाचा  खेळ भारताने आपल्या नावे करत हा  कसोटी सामना जिकंण्याची दावेदारी अधिक भक्कम केली.  भारतीय संघाचा नवा आधार म्हणून उदयास येणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आपल्या कारकिर्दीचे १७वे शतक झळकावत बॉकसिंग डे कसोटी सामन्यात शतक करणारा ५ वा भारतीय होण्याचा मान मिळवला. या बरोबरच  पुजाराने गांगुलीचा १६ शतकांचा विक्रम मोडला. तसेच व्ही व्ही एस लक्ष्मण याच्या १७ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
भारताने  ७ बाद ४४३ धावांवर आपला डाव घोषित केला असून ऑस्ट्रेलियाने बिन बाद ८ धावा केल्या आहेत. मेलबर्न कसोटीचा तिसरा दिवस निर्णायक ठरणार असून ४४३ धावांच्या दबावाचा सामना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज कसा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.