नवरीचा प्रियकराने केली Entry अन् मांडवात घातला धूमाकूळ, नवरदेव गेला रिकाम्या हाताने परत

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नसोहळा सुरु होता, वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही बाजूकडील मंडळी उत्साहाने मांडवात जमली होती. मात्र नववधूवरांच्या डोक्यावर आशीर्वादाच्या अक्षता पडणार तोच लग्नात विघ्न आले. चक्क नवरीच्या प्रियकराने मांडवात एन्ट्री करत धूमाकूळ घालायला सुरवात केली. क्षणभर काय घडतेय हे वऱ्हाडी मंडळीच्या लक्षात आले नाही. यामुळे लग्न सोहळा थांबवावा लागला. सात जन्माचे ऋणानुबंध जुळत असतानाच क्षणार्धात ते तुटले अन् नवरदेवाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

रविवारी सायंकाळी (दि. 17) जुना उमरसरा परिसरातील यशोधरा मराठी शाळेत लग्न विधी सोहळा सुरु होता. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील नवरदेव आपल्या वऱ्हाडासह वधू मंडपात दाखल झाला. मुलगी देखील आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्नास तयार झाली होती. लग्नविधी सुरू असतानाच मुलीचा प्रियकर तेथे आला. त्याने माझे हिच्यावर प्रेम आहे, मीच हिच्याशी लग्न करणार असे म्हणत नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींना धमकावणे सुरू केले. हा गोंधळ सुरू झाल्याचे पाहून नवरदेवाने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. लग्नातील भेटवस्तूसह इतर कुठलेच साहित्य न घेता आम्ही वरात घेऊन परत जात असल्याचा अर्ज पोलिसांना दिला.

दरम्यान हा धक्का सहन न झाल्याने नववधूची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल केले. नवरदेवाकडील मंडळींच्या हातापाया जोडूनही ते थांबण्यास तयार नव्हते. गोंधळ घालून तो प्रियकर तेथून निघून गेला. वधू पित्यानेही पोलिसात अर्ज दिला आहे. या दोन्ही अर्जाची चौकशी अवधूतवाडी पोलीस करीत आहेत.