बंगालची एक ‘कन्या’ दुसर्‍या ‘कन्ये’साठी निवडणुकीच्या मैदानात ! जया बच्चन TMC चा करणार प्रचार

मुंबई : भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात उतरल्या आहेत. त्या आजपासून ५ ते ८ एप्रिल असा चार दिवस विविध मतदारसंघात रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ‘बांग्ला निजेर मेयके चाय’( बंगालला आपली कन्या हवी आहे) अशी घोषणा दिली आहे. जया बच्चन या बंगालच्या कन्या आहेत. आता त्या बंगालच्या दुसर्‍या कन्या ममतादीदींच्या प्रचाराला आल्या आहेत.

बंगालमधील टालीगंजमध्ये तृणमूल काँग्रेस उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनासाठी जया बच्चन आज रोड शो करणार आहेत. अरुप विश्वास यांच्याविरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना उतरवले आहे.

६ व ७ एप्रिल रोजी जया बच्चन या विविध विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

भाजप व तृणमूल यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस आहे. भाजपने मिथुन चक्रवर्ती यांना प्रचारात उतरविले आहे. त्याला शह देण्यासाठी जया बच्चन यांना आता प्रचारात उतरविण्यात आले आहे.