केस ओले राहिले म्हणून सर्दी होते हा गैरसमज !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – केस ओले राहिल्यास आणि केस ओले ठेवून थंड हवेत फिरल्यास सर्दी-खोकला होतो असा समज सर्वश्रुत आहे. परंतु हे खरे नसून वस्तुस्थिती अशी आहे की, जोपर्यंत सर्दीशी संबंधित विषाणूंच्या संपर्कात व्यक्ती येत नाही तो पर्यंत ती व्यक्ती आजारी पडू शकत नाहीत, असे तज्ज्ञ सांगतात.

सर्दी ही विषाणूंमुळे होते. जर एखादी व्यक्ती सामान्य सर्दीचे कारक असलेल्या रायनो विषाणूंच्या संपर्कात आली तर सर्दी होऊ शकते. रायनो विषाणू हा कमी तापमानात उद्दीपित होतो. परंतु ओल्या केसांमुळे सर्दी होते हा समज निरर्थक आहे. त्याचप्रमाणे गारव्यात हायपोथर्मिया होण्याची शक्यता असते. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मात्र, जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आजारी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुंबईतील जसलोक रुग्णालयातील डर्मेटोलॉजिस्ट व ट्रायकोलॉजिस्ट डॉ. दीप्ती घिया यांनी म्हटले आहे.

ताप आल्यानंतर अ‍ॅस्पिरिन आणि पॅरासिटामॉलसारखी औषधे घेतल्याने ताप बऱ्यापैकी कमी होतो, परंतु सर्दी-खोकल्याचे विषाणू वेगाने प्रसार पावतात. जर शरीराचे तापमान कमी राहिले आणि हे विषाणू अवतीभवती असतील तर त्याचा प्रभाव पडणे साहजिकच असते. शेजारी जर सर्दी-खोकला-ताप असलेली व्यक्ती असेल तरीही त्या विषाणूंच्या प्रभावामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.