काय सांगता ! होय, घरात विलगीकरणासाठी जागा नसल्याने तरुणाने चक्क झाडावर काढले तब्बल 11 दिवस

हैदराबाद: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मृत्यूची आकडेवारी देखील वाढत आहे. कोरोनामळे हजारो कुटुंबे त्रस्त झाली आहेत. अशातच घरात विलगीकरणाची सुविधा नसल्याने एका तरुणाने चक्क झाडावर 11 दिवस काढले आहे. तेलंगणमधील नालगोंडा जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे. एक बादली दोरीला बांधून त्यातून अन्नपदार्थ आणि अन्य गरजेच्या गोष्टी वरती घेतल्याचे तरुणाने सांगितले.

शिवा (वय 18, रा. कोठानंदीकोंडा ) असे या तरुणाचे नाव आहे. तेलंगणमधील नालगोंडा जिल्ह्यात कोरोनाच्या सुविधांचा मोठा अभाव आहे. याचाच फटका महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या शिवाला बसला. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या गावातील डॉक्टरांनी इतर कोठेही जागा नसल्याने त्याला गृहविलगीकरणात राहावयास सांगितले होते. मात्र तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती सरपंचानाही होती. त्यांनी शिवाला मदत केली नाही. अशा परिस्थितीत शिवाला एक कल्पना सुचली. त्याने बांबूच्या काड्यांचा बिछाना तयार केला. तो झाडावर ठेवला. अशा प्रकारे त्याने 11 दिवस झाडावर काढले. याबाबत शिवा म्हणाला की, आमच्या गावात विलगीकरण केंद्र नाही. माझ्या कुटुंबात चौघे राहतात. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. गावातील काही जणांनी याबाबत संरपंचाना सांगितले होते. मात्र, ते मदतीसाठी पुढे आले नाहीत. तसेच गावातून अन्य कुणीही मदतीला आले नाही. सर्वजण कोरोनाला घाबरून घराबाहेरच पडत नाहीत, असे शिवाने सांगितले.