कारच्या सायलेन्सरमध्ये दडलंय काय ?; सोन्यापेक्षा महाग ‘या’ वस्तूमुळे चोरट्यांनी मारला डल्ला

अहमदाबाद : वृत्तसंस्था – कार डिलर्सनी दुकानासमोर पार्क केलेल्या इको व्हॅनच्या सायलेन्सरवर चोरट्यांनी हात साफ केला आहे. चोरट्यांनी आठवडाभरात तब्बल 33 वाहनांना निशाणा बनवत 21 लाख किंमतीचे सायलेन्सर ( Car silencer) लंपास केले आहेत. गुजरातमधील अहमदाबाद शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी चोरट्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अहमदाबादमधील दोन कार डीलरशिप सनाथलमधील किरण मोटर्स आणि बकरोलमधील लोकप्रिय मारुती सुझुकी मोटर्स स्टॉकयार्डने पार्क केलेल्या 33 वाहनांचे सायलेन्सर चोरून नेले आहे. इको व्हॅन सायलेन्सरची किंमत सुमारे 57 हजार 272 रुपये आहे. या दोन कार स्टॉकयार्डमधून चोरट्यांनी एकूण 20 लाख 59 हजार रुपयांचे सायलेन्सर चोरले आहेत.

सायलेन्सरमध्ये कॅटलॅटिक कन्व्हर्टर असते, जो प्लॅटिनम ग्रुप ऑफ मेटल्स (पीजीएम)ने बनलेला असतो. प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यांना PGM म्हणतात. त्यांची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. चोरी केल्यानंतर हे धातूचे कण सूरत आणि अहमदाबादसारख्या ठिकाणी जड उद्योगाला विकले गेले. 10 ग्रॅम मेटल डस्ट किंमत 3 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच, सेन्सरही भारताबाहेर आहे, ज्याची किंमत सुमारे 10 हजार रुपये आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा खेळ सुरू होता. चोरीच्या एक-दोन घटनांकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु पोलिसांना मोठ्या संख्येने चोरीची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला त्यावेळी ही चोरी उघडकीस आली आहे.