…म्हणून तुमचेही व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ‘या’ दिवसापासून होणार बंद

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जगातील सर्वात मोठी मेसेजिंग कंपणी असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर संदेश पाठविणाऱ्या (बल्क मेसेज) लोकांविरोधात कंपनीने एक निर्णय घेतला आहे. ज्याद्वारे रोज अशा प्रकारे संदेश पाठविणाऱ्या लोकांचे अकाउंट बंद केले जाईल. यासंदर्भात कंपनीने कायदेशीर कारवाई करण्याचादेखील इशारा दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅपवर ९० टक्के संदेश खाजगी स्वरूपाचे असतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून एकाच वेळी अनेक लोकांना मोठ्या प्रमाणावर ‘ठोक’ संदेश पाठविण्याचा प्रकार वाढला आहे. असे करणाऱ्या लोकांवर ७ डिसेंबर २०१९ पासून कारवाईस सुरुवात करणार असून त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप वरील खाते बंद करण्यात येईल.

सर्वाधिक ठोक संदेश राजकीय पार्ट्या आणि आणि डिजिटल मार्केटिंग करणारे लोक सर्वाधिक प्रमाणात पाठवत आहेत. याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात फसवे आणि बनावट संदेश देखील पाठविले जात आहेत. याबाबतीत अधिक माहिती देताना व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की १५ सेकंदांपेक्षा कमी वेळात १०० पेक्षा जास्त संदेश पाठविणाऱ्या अकाउंट ला दोषी मानले जाणार असून असे अकाउंट बंद केले जाणार आहे. याचबरोबर नवीन अकाउंट तयार झाल्यानंतर ५ मिनिटांच्या आत खूप मोठ्या प्रमाणावर संदेश पाठविले गेल्यास अशा अकाउंट वर देखील कारवाई केली जाणार आहे.

याचबरोबर जे खाते तयार झाल्याझाल्या लगेचच त्यावरून खूप मोठ्या प्रमाणावर ग्रुप तयार केले असतील आणि मोठ्या प्रमाणात लोकांना या ग्रुप मध्ये जोडले जातील असे अकाउंट देखील कंपनी बंद करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप चा व्यावसायिक आणि गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.