सर्वोच्च न्यायालयात मराठी !…जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड वकील साळवेंना म्हणतात – ‘जाऊ द्या’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज अनेकदा इंग्रजी भाषेतून चालते. मात्र, एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वकील हरीश साळवे यांना चक्क मराठीत ‘जाऊ द्या’ म्हटले. न्यायाधीश चंद्रचूड आणि वकील साळवे या दोन्ही मराठी व्यक्तींमधील हे संभाषण ऐकून सध्या एकच चर्चा सुरु आहे.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने विविध ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती आणि त्याचा पुरवठा याकडे लक्ष दिले जात आहे. त्यातच तामिळनाडूच्या वेदांता ऑक्सिजन प्लांटबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. या ठिकाणी होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा कोणाला करायचा यावरून वाद-प्रतिवाद सुरू होता. यादरम्यान वेदांताची बाजू मांडणारे वकील हरिश साळवे यांच्या एका वक्तव्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांना शांत करत मराठीत ‘जाऊ द्या’, असे म्हटले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात बहुतांशवेळा इंग्रजीत सुनावणी केली जाते. मात्र, दोन मराठी व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांनी देशाच्या सर्वोच्च अशा न्यायालयात मराठीत संभाषण केल्याने याचीच चर्चा सध्या सुरु आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड, वकील साळवेही महाराष्ट्रातीलच…

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात एका मराठी कुटुंबामध्ये झाला आहे. त्यांचे वडील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. तर हरिश साळवे हे भारतातील प्रसिद्ध वकील आहेत. तेही महाराष्ट्रातील आहेत. पाकिस्तानात अडकलेले कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात साळवे यांनीच लढला. तसेच यांसारखे अनेक मोठे खटले हरिश साळवे यांनी लढले आहेत.