Sachin Vaze : NIA समोर सचिन वाझेंची बोलती बंद, अडचणी वाढणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. सचिन वाझे यांना एनआयएने न्यायालयात हजर केले असता, त्यांना 11 दिवसांची एनआयए (NIA) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टमाइंडचा शोध घेण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (CIU) विभागातील अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे.

NIA कडून चौघांची कसून चौकशी

सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर पोलीस दलातील आणखी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या दोन अधिकारी आणि दोन वाहन चालकांची NIAकडून कसून चौकशी करण्यात आली. NIAकडून चौघांची तब्बल साडेनऊ तास कसून चौकशी करण्यात आली. याशिवाय आणखी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

या अधिकाऱ्याची चौकशी

सचिन वाझे यांना रविवारी विशेष न्यायालयाने 11 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. या कालावधीमध्ये या कटाचा छडा आणि आवश्यक पुरावे गोळा करण्याचे आव्हान NIA च्या अधिकाऱ्यांपुढे असणार आहे. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (CIU) विभागातील सहायक निरीक्षक रियाजुद्दीन काझी, एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन वाहनचालकांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

सहायक आयुक्तांची चौकशी होणार

सचिन वाझे यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गुन्ह्याच्या कामात त्यांना सहकार्य केल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. त्यांच्यासह एक सहायक पोलीस आयुक्त व अन्य काही पोलिसांना लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजतेय. यामध्ये विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 18 फेब्रुवारीला त्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून स्कॉर्पिओ चोरीचा गुन्हा दाखल केला, याची चौकशी करण्यात येणार आहे.

NIA च्या हाती मोठे पुरावे

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, एनआयएने सचिन वाझे यांच्याकडे केलेल्या चौकशीत मोठे पुरावे हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीच्या सुरुवातीला सचिन वाझे हे एनआयएच्या अधिकाऱ्यांसमोर काहीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी एक-एक करून पुरावे दाखवल्यानंतर सचिन वाझे यांच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. अखेर सचिन वाझे यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यास सुरुवात केली.

स्कॉर्पिओवर वाझेंच्या हाताचे ठसे

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर आढळून आलेले ठसे एनआयएने परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर आढळून आलेले हाताचे ठसे हे सचिन वाझे यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत मोठी भर पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, सचिन वाझे यांनी अद्याप कोणताही जबाब दिला नसल्याची माहिती एनआयच्या वकिलांनी एनआयएच्या विशेष न्यायालयात दिली.

ती इनोव्हा कार क्राइम ब्रँचचीच

जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ही इनोव्हा गाडी क्राईम ब्रँचच्या वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ताची (CIU) असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ही कार रविवारी जप्त केली.

वाझेंवर लवकरच 302 चा गुन्हा

सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाझे यांच्यावर लवकरच मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या गुन्ह्याची कलमे लावली जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येत आहे.