घशात अडकली शिट्टी…अन सगळ्यांचीच झाली ‘पळता भुई थोडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलं अनेकदा बारीक सारीक वस्तू खेळता खेळता तोंडात घालतात त्यामुळे अनेकदा या वस्तू घशात अडकल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. मुंबईतील एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाच्या घशात शिट्टी अडकली आणि यामुळे सगळ्यांचीच पळता भुई थोडी झाली. घशात शिट्टी अडकल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर दुर्बिणीने शस्त्रक्रिया करीत ही शिट्टी अखेरीस बाहेर काढली आणि त्याच्या पालकांसाहित सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईतील ऐरोली येथे राहणाऱ्या गौरव सांळुके  या आठ वर्षाच्या मुलाने खेळता खेळता प्लास्टिकची शिट्टी तोंडात घातली आणि त्याच्या श्वसनमार्गात ही शिट्टी अडकल्यामुळे तो कासावीस झाला त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. भेदरून गेलेल्या गौरवच्या पालकांनी त्याला तातडीने लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये आणले. रुग्णालयाच्या नाक, कान घसा विभागातील डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे त्याच्या जिवावरील धोका टळला.

गौरव तिसरीत शिकतो. त्याचे वडील रिक्षाचालक, तर आई घरी शिकवण्या घेते. आई विद्यार्थ्यांना शिकवत असताना गौरव शेजारीच खेळत होता. त्याच्या तोंडात प्लॅस्टिकची लहान शिट्टी होती. ही शिट्टी त्याने गिळली व ती श्वसनमार्गामध्ये अडकली. खोकल्याची उबळ आल्यानंतर तो हैराण झाला, त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करणे या दाम्पत्याला शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी तातडीने लो. टिळक रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे श्वसनमार्गात अडकलेली शिट्टी बाहेर काढली. आठ वर्षांच्या गौतमला कान-नाक-घसा विभागामध्ये ठेवण्यात आले होते. गौतमला होत असलेल्या वेदना आता पूर्णपणे थांबल्या आहेत.