Corona Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘फायझर’च्या आपत्कालीन वापराला मंजूरी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे संपूर्ण जग अस्वस्थ झाले आहे. कोरोनावरील लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे तर काही लसी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला जागतिक आरोग्य संघटनेने आज गुरुवारी फायझर-बायोनटेक (Pfizer-BioNTech) लशीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या एका वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील पहिली लस म्हणून आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे.  ब्रिटनने ८ डिसेंबर रोजी या लशीला मान्यता देऊन लशीकरणाची मोहीम सुरु केली आहे. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपियन युरोपिअन देशांनीही या लशीला मान्यता दिली आहे.

आरोग्य संघटनेच्या मारियानगेला सिमाओ यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटलं आहे की, कोरोनाविरोधातील लढाईसाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून ही मंजूरी आहे,  पण साऱ्या जगाची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात लशीचा पुरवठा होण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची आणखी गरज आहे. आरोग्य संघटनेने म्हटलंय की, आपत्कालीन  वापरासाठी परवानगी देण्यात आल्याने विविध देशांमधील नियामकांना लशीचे आयात आणि वितरण मंजूर करण्यासाठीचा मार्ग मोकळा होत आहे. याआधी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या तज्ज्ञ तसेच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायजर-बायोटेकच्या लशीच्या सुरक्षा, दर्जा तसंच इतर गोष्टींची पडताळणी करण्यासाठी सांगितलं होतं. यादरम्यान फायजर-बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचं समोर आलं. तसंच कोरोनामुळे निर्माण होणारे धोके लशीमुळे दूर होत असल्याचंही सांगण्यात आलं.