WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञांचा दावा, म्हणाल्या – ‘नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करत आहे. त्यातच आता तिस-या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जगभरात 12 वर्षांखालील मुलांना कोरोना लस दिली जात नाही आहे. मात्र भारतात अद्याप 18 वर्षांखालील मुलांना लसीकरणासाठी मंजुरी मिळाली नाही. अशावेळी लहान मुलांबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. WHO च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या मते कोरोनाची नेजल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. कोरोना विषाणूंपासून मुलांना संरक्षण देण्यात प्रभावी ठरू शकते.

सौम्या स्वामीनाथन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, ज्यावेळी लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. त्यावेळीच मुलांना शाळेत पाठवावे. भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. हे व्हॅक्सिन नाकावाटे दिले जाणार आहे. कंपनीच्या मते नेजल स्प्रेचे केवळ 4 थेंब पुरेसे असतील. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने नेजल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, सध्या या विषाणूचा परिणाम मुलांवर कमी होत आहे. जगाची आणि देशाची आकडेवारी पाहिल्यास फक्त 3 ते 4 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. NITI आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, जर मुल कोरोना संक्रमित असतील तर ब-याचदा कोणतेही लक्षण नसते. किंवा कमी लक्षणे दिसतात. अशा मुलांना सहसा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. परंतु आपण 10-12 वर्षाच्या मुलांवर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.