जगभरात किती टक्के लोकांमध्ये विकसित झाली कोरोना अँटीबॉडी ?, WHO ने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा कोटींवर पोहचली आहे. लाखो लोकांना या जीवघेण्या व्हायरसमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरु असून चाचण्या घेण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. याच दरम्यान जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली दिली आहे.

10 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडी विकसित झाली आहे. अशी माहिती WHO च्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत दिली. अत्यंत उच्च घनता असलेल्या शहरी वस्तींमध्येही लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाल्याचे स्वामिनाथन यांनी सांगितले. तसेच हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंजूर लसी मृत्यूपासून संरक्षण देतात

सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, सध्या मंजूर झालेल्या लसी या गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूपासून संरक्षण देतात. सौम्य आजार आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाशी संबंधित लसींच्या परिणामकारतेचा अद्याप अभ्यास केला जात असल्याचे स्वामीनाथन यांनी दिली आहे. या संदर्भात एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिले आहे.

भारतात 1 कोटींच्यावर रुग्ण

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतात देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 96 हजार 731 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात भारतात 15 हजार 510 नवे रुग्ण आढळून आले असून 106 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

होळी ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’ ठरु शकते

देशात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे. तसेच लोकांनी योग्य ती काळजी घेतली नाहीतर यंदाची होळी ही ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’ ठरु शकते असा इशारा देखील आरोग्य तज्ञांनी नागरिकांना दिला आहे.

या राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जर निष्काळजीपणा दाखवला तर…

आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देताना म्हटले आहे की, कोरोनाच्या बाबतीत आता जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत नागरिकांनी सार्वजनिक कार्यापासून दूर राहिले पाहिजे. खासकरुन होळीच्या वेळी. कारण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. होळीच्या काळात सध्याच्या तुलनेत अनेक पटीने रुग्णसंख्या वाढू शकते.

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने खुल्या मनाने स्वागत करा, हात मिळवणं टाळा, मिठी मारणं टाळा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.