Pune News : इंटेरिअर डिझायनर पतीला ‘क्लायंट’समोरच धुतले, पतीने दिला तिहेरी तलाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंटेरियर डिझायनर असलेल्या पतिला एका महिला क्लायंटसोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीला मारहाण केली. या प्रकारामुळे संतापलेल्या पतीने पत्निला तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. पती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तलाकविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीने देखील पत्नी विरोधात मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. हा प्रकार गुरुवारी एका हॉटेलमध्ये घडला. पत्नी झुबेदा (नाव बदलले आहे) ही पती दिलशानवर (नाव बदलले आहे) पाळत ठेवत होती. पतीचा पाठलाग करत ती हॉटेलमध्ये पोहचली आणि त्या ठिकाणीच त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली.

झुबेदा आणि दिलशान हे दोघे मागील दीड वर्षापासून विभक्त राहतात. गुरुवारी दिलशानची एका महिला क्लाएंटसोबत मिटींग होती. ते दोघे कॅफे कॉफी डे मध्ये भेटले. हॉटेल बाहेर आपल्या पतीची बीएमडब्लू कार पहिल्यानतंर झुबेदा त्या ठिकाणी थांबली. झुबेदा ही आपल्या आई आणि भावा सोबत मुलीच्या शाळेत निघाली होती. आपला पती कोणासोबत आहे आणि काय करत आहे हे पाहण्यासाठी झुबेदा हॉटेलमध्ये गेली. त्यावेळी दिलशान महिला क्लाएंटसोबत बोलत होता.पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या झुबेदाने थेट पतीसमोर जाऊन याचा जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची होऊन हे प्रकरण भांडणापर्यंत पोहचलं. झुबेदाने महिला क्लायंटसमोरच मारहाण केली, असे दिलशानचे म्हणणे आहे.

चारचौघात आणि खासकरुन ग्राहकासमोर हा तमाशा पाहून दिलशान देखील संतापला त्याने आपल्या पत्नीला तलाक देऊ टाकला. असा तलाक देणे कायद्याने गुन्हा असून देखील दिलशानं पत्नीला अशाप्रकरे तलाक दिला. दिलशानने असाही आरोप केला आहे की, त्याचे वडील मध्यस्थी करण्यासाठी झुबेदाच्या घरी गेले होते. त्यावेळी तिच्या घरच्यांनी वडीलांना देखील मारहाण केली. तर झुबेदाने पोलिसांना सांगितले की, तीने पतीसोबत असलेल्या महिलेला तुझ नात काय असा प्रश्न विचाराल. यावरून दिलशानने तलाक दिला असल्याचे झुबेदाने तक्रारीत म्हटले आहे.

कोंढवा पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरुन पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीच्या तक्रारीवरून महिलेविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती विरोधात तलाकविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.