Bharat Biotech च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार – अजित पवार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाला हरवण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरीकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. तसेच लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकच्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरु असून ते काम तातडीने मार्गी लागेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण नियोजन केले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. तसेच दौंड उपजिल्हा रुग्णालयातर्फे देऊळगाववाडा येथे विस्तारीत कोविड सेंटर सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.