Facebook वर अमेरिकेत खटला; कंपनीच्या विभाजनाची शिफारस

वाॅशिंग्टन : पोलिसनामा ऑनलाईन – अनुचित पद्धतीने प्रतिस्पर्धा राेखण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत साेशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी फेसबुकवर अमेरिकेत खटला दाखल केला आहे. तसेच कंपनीचे विभाजन करण्याची शिफारस फेडरल ट्रेड कमिशनने केली आहे. अमेरिकेच्या अँटी ट्रस्ट कायद्यांतर्गत हा खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या विभाजनाची शिफारस मान्य झाल्यास मार्क झुकेरबर्गने उभारलेल्या फेसबुकच्या साम्राज्याला धक्का बसण्याची शक्यता आहे.

डिजिटल बाजारपेठेत फेसबुकने वर्चस्वाचा दुरुपयाेग केला असून, या दशकात अनेक लहान कंपन्यांना विकत घेऊन साेशल मीडियामधून प्रतिस्पर्ध्यालाच संपविल्याचा आराेप करण्यात आला आहे. कंपनीने प्रचंड वापरकर्त्यांची माहिती गाेळा केली असून, हे धाेकादायक असल्याचे ट्रेड कमिशनने दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे.

दरम्यान ट्रेड कमिशनने चार महिन्यांपूर्वी झुकेरबर्गची चाैकशीही केली हाेती. गेल्या वर्षी तर कंपनीला ३४ हजार काेटी रुपयांचा दंडही भरावा लागला हाेता. इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सऍपच्या माध्यमातून फेसबुकला प्रचंड उत्पन्न मिळत आहे.

फेसबुकने आराेप फेटाळले
वापरकर्ते तसेच अनेक लहान व्यापाऱ्यांना फेसबुकच्या सुविधा माेफत मिळतात. तसेच फेसबुकने खरेदी केल्यामुळे या दाेन्ही ऍपमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या असून, जास्तीत जास्त लाेकांपर्यंत पाेहाेचल्याचा फायदाही झाला आहे, असे झुकेरबर्गने कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या एका पाेस्टमध्ये म्हटले असून ट्रेड कमिशनने केलेल्या आरोपाचे खंडणही केले आहे.

गुगल, मायक्राेसाॅफ्टवरही खटले
गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये टेक जायंट कंपनीने ‘गुगल’वर अशाच पद्धतीचा खटला दाखल केला हाेता, तर मायक्राेसाॅफ्टवरही १९९० मध्ये अशाच प्रकारच्या आराेपांवरून कंपनीचे विभाजन करण्यात आले हाेते. ‘ ऍपल’ आणि ‘ ऍमेझॉन ’ या कंपन्याही ट्रेड कमिशनच्या रडारवर आहेत.