काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या बंगल्यावर महिलेची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये म्हणाली -‘आता सहन होत नाही…’

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे माजी वनमंत्री आणि काँग्रेसचे नेते उमंग सिंघार यांच्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजधानी भोपाळच्या शाहपूरा परिसरात असलेल्या सिंघार यांच्या बंगल्यात घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी महिलेच्या पर्समध्ये तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली.

या घटनेचा तपास करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी रिंकू जाटव यांनी सांगितले की, सोनिया संजीवकुमार भारद्वाज (वय-39) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सोनिया हरियाणाच्या अंबाला येथील बालदेव नगर येथील रहिवासी आहेत. मयत महिला भोपाळमध्ये माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या शहापूर येथील बंगल्यात रहात होती. रविवारी (दि.16) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. माजी मंत्र्यांच्या बंगल्यात एका महिलेने आत्महत्या केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

आता मला सहन होत नाही

सोनिया भारद्वाज या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, मला तुमच्या आयुष्यात स्थान हवं होतं. आता मला सहन होत नाही. त्यासोबत तिने तिच्या मुलाबद्दल लिहिले की, तू मला आवडतोस, परंतु मी तुझ्यासाठी काहीच करु शकत नाही. आय लव्ह यू. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. ही महिला 25 दिवसांपासून या बंगल्यात राहण्यास होती. तर माजी मंत्री उमंग सिंघार हे देखील घटनेच्या दोन दिवसापर्यंत बंगल्यात राहण्यास होते. तपासानंतरच या महिलेचे आणि माजी मंत्री सिंघार याच्यात काय संबंध होते ? हे समजू शकेल.

या प्रकरणी अतरिक्त पोलीस अधीक्षक राजेश भदौरिया यांनी सांगितले की, महिलेचे पतीसोबत काही वाद सुरु होते. या महिलेला 18 वर्षाचा एक मुलगा आहे. माहितीनुसार सिंघार यांनी त्यांच्या मतदारसंघात जावू नये असं या महिलेला वाटत होते. मात्र ते दोन ते तीन दिवसांपूर्वीच मतदारसंघात गेले होते. तर उमंग सिंघार यांनी सांगितले की, मी स्वत: हैराण आहे. ती माझी चांगली मैत्रिण होती तिने असं का केलं ? असे त्यांनी सांगितले.