पुणे जिल्हा परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय; सर्वच पंचायत समित्यांमध्ये सखी कक्षाची स्थापना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जागतिक महिला दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. परंतु निसर्गतः महिला शारीरिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा भिन्न आहेत. त्यांना मासिक पाळीच्या कालावधीतही ८ ते १० तास सलग शारीरिक अथवा मानसिक श्रमाचे काम करणे महिलांसाठी खूप अवघड असते. त्यामुळे जिल्ह्यात महिलांना मासिक पाळीच्या दिवसांतही काम करणे सोयीचे व्हावे, यासाठी त्यांना मदत म्हणून पुणे जिल्हा परिषदेत व सर्व पंचायत समित्यांमध्ये सखी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात वेदना, अतिसार, डोकेदुखी, मळमळ, पाय दुखणे, थकवा, अशक्तपणा, उलट्या होणे अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. महिलांची ही गरज ओळखून पुणे जिल्हा परिषदेने कक्ष सथापन केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महिलांसाठी मुक्त संवादाचे महिला व बालकल्याण विभागामार्फत आयोजन करण्यात आलं होते. या सभेमध्ये एकूण १२५ महिला व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या सभेत काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.

मासिक पाळीच्या काळात महिलांना काम करणे शक्य व्हावे म्हणून सखी कक्ष उभारण्यात यावा. महिला कर्मचाऱ्यांसाठी तक्रार पेटी असावी. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी वाहतूक व्यवस्था असावी. वर्षातून दोन वेळा महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणीचे आयोजन व विशेष मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करावे. जिल्हा परिषदेत पाळणाघर असावे, महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह असावे, त्याचबरोबर महिलांसाठी विविध कार्यक्रम अथवा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे आदी मागण्या महिलांनी केल्या होत्या. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तात्काळ कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.