मुलगा फरसाणच्या कंपनीत काम करून बनल ऑर्मी ऑफिसर, अन् आईच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

डेहरादून : वृत्तसंस्था – बिहारच्या आराह येथील बालबंका तिवारी या तरुणाने खडतर आणि संघर्षमय प्रवास करुन सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. मुलाच्या अंगावर सैन्य दलाचा गणवेश पाहून त्याच्या आई आणि पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या मुलाने महाविद्यालयीन जीवन जगताना केलेल्या कष्टाची आठवण झाल्याने आई मुन्ना देवी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. बालबंका यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासूनच कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, 50 ते 100 रुपये मिळविण्यासाठी ते दिवसभर म्हणजेच 12 तास काम करत. बालबंका यांचे वडिल शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती. त्यामुळे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना लवकरच कामावर जावे लागले. 12 वी नंतर आरा येथून मी ओडिशातील राऊरकला येथे गेलो. दरम्यानच्या काळात लोखंडाच्या कंपनीत आणि फरसाणच्या कंपनीतही काम केले. येथून मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही, असे बालबंका यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले आहे. कमवा आणि शिका असाच त्यांचा प्रवास राहिला.

यापूर्वी होते सैन्यदलात शिपाई
सैन्य दलात अधिकारी बनण्यापूर्वी ते सैन्य दलातच शिपाई म्हणून भरती झाले होते. तिवारी यांनी 2012 मध्ये भोपाळच्या ईएमई सेंटरमधून आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच परीक्षा पास केली होती. शिपाई पदी रुजू झाल्यानंतरच त्यांनी आर्मी कॅडेट कॉलेजसाठी तयारी सुरू केली. या परीक्षेत 2017 साली त्यांना यश मिळाले आहे. आता सैन्य दलात अधिकारी बनून देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्याने अत्यानंद झाल्याचे ते म्हणाले.

वडिलांनाही अत्यानंद
आपल्या एका नातेवाईकांकडून बालबंका यांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना गावात मिळणाऱ्या मान-सन्मानामुळे मी प्रभावित झालो होतो. त्यामुळेच, मी सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न वारंवार पाहात होतो, त्यापासून मी कधीही दूर पळालो नाही. आता, माझे वडिल उद्या वर्तमानपत्रात बातमी पाहतील आणि संपूर्ण गावाला माझ्या यशाची गोष्टी सांगतील, असेही बालबंका यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे.