World Test Championship : ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् AUS फायनलमधून बाहेर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टेस्ट सिरीज ३ – १ ने जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारत आणि न्यूझीलंड मध्ये १८ ते २२ जून मध्ये पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवण्यात येणार आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. या मॅचमध्ये विराट कोहली आपल्या नेतृत्वात भारताला पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तसेच या वर्षी भारतात टी-20 वर्ल्ड कपसुद्धा होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये विजय मिळवल्याने ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पण ऑस्ट्रेलियाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही.

ऑस्ट्रलियाने केली हि मोठी चूक
२०१९ मध्ये हेडिंग्लीमध्ये झालेल्या रोमांचक मॅचमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा एका विकेटने पराभव केला होता. या सामन्यात बेन स्टोक्सच्या शतकामुळे इंग्लंडने ३५९ रनचं आव्हान ९ विकेट गमावून पूर्ण केले होते. मात्र याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनकडून एक मोठी चूक घडली. इंग्लंड ३५१ धावांवर खेळत असताना पॅट कमिन्सने टाकलेला बॉल जॅक लिचच्या पायाला लागला. पण तो बॉल स्टम्पच्या खूप बाहेर होता, पण तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने शेवटचा डीआरएससुद्धा गमावला.

यानंतर इंग्लंडला विजयासाठी दोन रनची गरज असताना नॅथन लायनने टाकलेला बॉल बेन स्टोक्सच्या पॅडला लागला, पण अंपायरने त्याला नॉट आऊट दिले. त्यानंतर रिप्लेमध्ये पहिले असता बॉल पिचच्या लाईनमध्ये होता आणि स्टम्पला लागत होता, हे दिसत होतं, पण ऑस्ट्रेलियाकडे डीआरएस शिल्लक नसल्यामुळे स्टोक्स वाचला आणि इंग्लंडचा विजय झाला. जर त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे डीआरएस शिल्लक असता तर ऑस्ट्रेलिया हि मॅच जिंकली असती. ऑस्ट्रेलिया हि मॅच जिंकली असती तर 24 पॉईंट्स मिळवून ती सरासरी अंकांच्या आधारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पहिल्या क्रमांकावर गेली असती.