उद्योजक बाबासाहेब कल्याणी यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   उद्योग क्षेत्रातील योगदानाने पुण्याचे नाव सातासमुद्रापार पोहचविणा-या कल्याणी समूहाच्या बाबासाहेब नीळकंठ कल्याणी यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्रिदल पुुणे पुण्ययभूषण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी मंगळवारी (दि. 23) हा पुरस्कार जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हा पुरस्कार सोहळा होणार आहे. तसेच यावेळी स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढतांना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरविण्यात येणार आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने कल्याणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. बाबासाहेब कल्याणी हे एकूण 3.0 बिलीयन डॉलर्सची उलाढाल असणाऱ्या कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर लढताना जखमी होऊन अपंग झालेल्या जवानांचा गौरव होणार आहे. यात नाईक – धरमवीर सिंग, नाईक – सुरेश कुमार कर्की, शिपाई – के. नागी रेड्डी, श्रीमती हौसाबाई पाटील (सातारा) आणि माधवराव माने (सांगली) यांना गौरविण्यात येणार आहे.

पुण्यभूषण पुरस्कारासाठी 2020 मध्येच निवड केली होती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा पुरस्कार जाहीर केला नव्हता. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह आणि 1 लाख रुपये रोख असे आहे. पुरस्काराचे यंदाचे 32 वे वर्ष आहे.