अनंत गीतेंच्या वक्तव्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, म्हणाले – ‘तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडीचे सैनिक नाही. तसेच आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वबळावर आपण ताकद दाखविणे गरजेचे असल्याचे विधान शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले. गीते यांनी केलेल्या या विधानामुळे सर्वांंच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शृंगारतळी येथे (ता. गुहागर) पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी गीते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे आपण नेमके कुणाशी लढायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. या कारणाने शिवसैनिकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी मी आलो आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये मी असे मेळावे, बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोठेही आघाडी झालेली मला दिसली नाही. तसे मी स्वबळावर लढावे असे आदेश दिले होते. त्यामुळेच राज्यात 3,300 इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्याचे गीते म्हणाले. यावेळी त्यांनी आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख बाबू सावंत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, पंचायत समिती सदस्या पूर्वी निमुणकर, रवींद्र आंबेकर, शृंगारतळी शहरप्रमुख नरेश पवार, नारायण गुरव, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार उपस्थित होते.