Pune : तरुण व्यावसायिकाची खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या; चुलत भावाला पाठविला आईबाबत व्हाईस मेसेज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या आईची काळजी घ्या असा व्हाईस मेसेज चुलत भावाला पाठवून एका तरुण व्यावसायिकाने खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी (दि. 7 ) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

चंद्रशेखर गोपाळ पुजारी (वय 31 रा. सोमवार पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

फरासखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरचा सोमवार पेठेत हातगाडीवर वडापाव व डोसा विक्रीचा व्यवसाय होता. गुरुवारी पहाटे तो दुचाकीवरून खडकवासला धरणाजवळ आला. त्यानंतर माझी दुचाकी खडकवासला धरणाजवळ लावली आहे. मी आत्महत्या करत असून गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या. तसेच माझ्या आईची काळजी घ्या, असा व्हॉइस मेसेज चंद्रशेखरने आपल्या चुलत भावाला पाठवला. त्यानंतर चुलत भाऊ व नातेवाईकांनी तातडीने खडकवासला येथे येऊन त्याचा शोध घेतला. त्यावेळी त्याची दुचाकी आढळून आली. मात्र त्याचा शोध लागला नसल्याने नातेवाईकांनी फरासखाना पोलिस ठाण्यात चंद्रशेखर हरवला तक्रार दिली होती. मात्र शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास चंद्रशेखरचा मृतदेह खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात तरंगताना आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, पोलीस हवालदार रामदास बाबर, दिलीप गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. फरासखाना पोलीस तपास करत आहेत.