रात्री क्रिकेटचा सामना होता सुरु, दोघे आले दुचाकीवरून गोळीबार केला अन्…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा तालुक्यातील भेंडा येथे एक धक्कादायक घटना घडली. काल (रविवार) रात्री साडेनऊच्या सुमारास एका मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळत होते. त्यादरम्यान दोघे दुचाकीवरून आले आणि त्यांनी खेळाडूंच्या दिशेने गोळीबार केला. त्यामध्ये एका तरुणाच्या छातीला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊनसदृश्य अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार, अनेक मैदानी खेळांनाही बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास क्रिकेट सामने होतात. भेंडा गावातही क्रिकेटचे सामने सुरु होते. रात्री साडेनऊच्या सुमारास काही तरुण क्रिकेट खेळत होते. त्यावेळी दोघे दुचाकीवरून मैदानात आले. त्यानंतर त्यांनी खेळाडूंच्या दिशेने गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी सोमनाथ बाळासाहेब तांबे (21, रा. भेंडा) याला लागली आणि यामध्ये तो जखमी झाला. छातीत गोळी लागल्याने तो खाली कोसळला. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. बाकीचे खेळाडू त्याच्या मदतीला धावले. त्यानंतर त्याला नेवासा फाटा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जाऊन जखमी तांबे याच्याकडे विचारपूस केली. तसेच आरोपींविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या संशयित पप्पू जावळे व गणेश पुंड यांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण आरोपींनी तांबे याच्यावर गोळीबार का केला? याची माहिती मिळू शकली नाही.