मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोना रुग्णावरील उपचारासाठी Zydus cadila च्या Virafin औषधाला मंजुरी, पेशंट आता लवकर बरे होणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे औषध, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णावर उपचारासाठी केंद्राने Zydus cadila च्या Interferon alpha-2b म्हणजे Virafin या अँटिव्हायरल औषधाला मंजुरी दिली आहे. आपात्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे.

या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरा होतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते, असा दावा कंपनीने केला आहे. हे औषध ज्या रुग्णांना देण्यात आले आहे. त्यापैकी 91.15% रुग्ण 7 दिवसांतच निगेटिव्ह झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. मध्यम लक्षण असलेल्या कोरोना रुग्णांसाठी या औषधाचा वापर केला जाणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे औषध दिले जाणार आहे.