नागरिकांना पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावणारा सराईत गुंड गजाआड

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
नागरिकांना पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावणाऱ्या गुंडाला दत्तवाडी पोलीसांनी पिस्तूलासह अटक केली. जुबेर जाफर शेख (वय-23, रा. श्रीकृष्ण मित्रमंडळ शेजारी, दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन जिवंत पितळी काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दत्तवाडीमधील बालशिवाजी चौक या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आले असुन त्याच्यावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ हे आपल्या सहकार्यासह दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना बालशिवाजी चौक परिसरात एक व्यक्ती हातात पिस्तूल घेऊन रस्त्यावरील नागरिकांना धमकावत शिवीगाळ करत असल्याची खबर डफळ यांना नागरिका मार्फेत मिळाली. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर यावेळी बालशिवाजी चाैकात आरोपी शेख हा हातात पिस्टल घेऊन नागरिकांना दमदाटी करत असल्याचे पोलीसांना दिसले.