पुण्यातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी 12 मार्चपासून

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन-

पुणे शहर पोलीस दलातील 213 पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले असून त्याची मुदत शनिवारी संपली आहे. या उमेदवारांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी 7 एेवजी 12 मार्चपासून घेण्यात येणार आहे.

पुणे शहर पोलीस दलातील 213 पदांसाठी एकंदरीत 50 हजार उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये 40580 पुरुष उमेदवार तर 8735 महिला उमेदवारांचा समावेश आहे. सुरुवातीला अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी होती. नंतर ती 3 मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. तसेच या उमेदवारांची मैदानी चाचणी 7 मार्चपासून सुरु करण्यात येणार होती. मात्र मैदानी चाचणी घेण्यासाठीच्या पूर्व तयारीसाठी घटक प्रमुखांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी 7 मार्च एेवजी 12 मार्च रोजी पासून सुरु करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात त्यादृष्टीने सर्व तयारी केली आहे.

शारिरीक मोजमाप आणि मैदानी चाचणीचा दिनांक व वेळ महाआॅनलाईन कंपनी मार्फत उमेदवारांना कळविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी दिली आहे.