आमदार पुत्राविरुद्ध पोलीस ठाण्यात एट्रोसिटीचा गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सरपंच पदाच्या निवडणुकीवरुन झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. कोंत्याव बोबलाद (ता. जत) या ग्रमपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीवरुन रविवारी (दि.२२) रात्री हा प्रकार घडला. या घटनेत उमदी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आमदार विलासराव जगताप यांच्या मुलासह नऊजणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या हाणामारीत दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

उमदी पोलिसांनी दोन्ही गटाच्या 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि.२२) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोन्ही गटाचे सातजण जखमी झाले आहेत.

श्रीशैल सेदाप्पा कांबळे (वय 42) यांच्या फिर्यादीनुसार आमदारपूत्र मनोज विलासराव जगताप, रमेश एकनाथ जगताप, तुकाराम प्रकाश जगताप, नवनाथ उत्तम जगताप, शिवाजी यशवंत जगताप, धैर्यशील चंद्रहास जगताप, अमर चंद्रहास जगताप, गोपाळ बाळकृष्ण जगताप, कुलदीप जनार्दन जगताप यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ, दमदाटीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मनोज विलासराव जगताप (वय 42) यांच्या फिर्यादीनुसार शिवाजी भिवा करे, महेश भिवा करे, मुरलीधर सुबराव जगताप, शंकर मारूती सावंत, गणपती सर्जेराव जगताप, श्रीशैल सेदाप्पा कांबळे, पुंडलिक बसाप्पा कांबळे, गणपती महादेव जगताप, बाळासाहेब सर्जेराव जगपात यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि बोलेरोच्या तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंत्याव बोबलाद येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे. सरपंचपद अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मनोज जगताप यांच्यासह त्यांचे समर्थक सरपंच पदाचे इच्छुक उमेदवार श्रीशैल कांबळे यांच्या घरी गेले. त्यावेळी आमच्या उमेदवाराविरोधात तू निवडणूक लढवत आहेस असे म्हणून त्यांचा चुलत भाऊ पुंडलिक कांबळे याच्या घरात घुसले. त्यानंतर त्यांचा पुतण्या माणिक याला काठी, बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांचे वडील सेदाप्पा व श्रीशैल यांना जातीवाचक शिवागाळ करून त्यांना बेदम मारहाण कऱण्यात आली. यामध्ये श्रीशैल कांबळे, माणिक कांबळे, भिमाण्णा कांबळे, सेदाप्पा कांबळे जखमी झाले आहेत.

मनोज जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून श्रीशैल कांबळे यांच्यासह संशयितांनी त्यांच्या बोलेरोवर (एमएच 13 एझेड 3627) दगडफेक केली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर गोपाळ जगताप, कुलदीप जगताप, शिवाजी जगताप यांना गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. त्यानंतर मुरलीधर जगताप याने मनोज यांना मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली तसेच शिवाजी करे याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार अठराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे, उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या कोंत्याव बोबलाद येथे तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी जत बंदचे आवाहन

दरम्यान या घटनेच्या निषधार्थ बसपतर्फे बुधवारी जत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जत नगरपरिषदेचे बांधकाम सभापती व बसपाचे नेते भूपेंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, कोंतेवबोबलाद ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस व बसपा यांची युती आहे. सरपंचपदासाठी श्रीशैल बसाप्पा कांबळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी निवडणूक लढवू नये म्हणून भाजपचे लोक मारहाण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.