पुणे मनपातील भाजपची केजरीवालांसारखी अवस्था

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
“भाजप सरकार निवडून येऊन वर्ष पूर्ण झाले आहे.साने गुरुजी वसाहतीतील तसेच पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न पहिल्या भाषणात मांडला होता. पण वर्षभरात आयुक्त केवळ आश्वासन देऊन टाळत आहेत. महापौर गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षात तरी मार्ग काढा, हात जोडून विनंती करतो,” अशी विनंती इतर कोणी नाही तर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी सर्वसाधारण सभेत केली.

महापालिका निवडणुकांचे निकाल लागून आता एक वर्ष पूर्ण झाले. भाजप प्रचंड बहुमताने सत्तेत आले. वर्षपूर्ती निमित्त झालेल्या कामांचे भाजप कडून ढोल बडविले जात असताना त्यांच्याच एका सदस्याने प्रश्न सोडविण्यासाठी ‘हात जोडून’ विनंती केल्याच्या घटना सर्वसाधारण सभेत घडली.आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थितील आहे भाजप नगरसेवकांची.

धीरज घाटे म्हणाले,”सभागृहात एक वर्षांपूर्वी निवडून आलो.मी राहत असलेल्या साने गुरुजी नगर मधील कर्मचाऱ्यांच्या दोन वसाहतींच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न उपस्थित केला होता. आज वर्ष झालं. नागरिक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. त्याचसोबत आमच्या वसाहतीचा निर्णय कधी मार्गी लागणार अशी विचारणा करत आहेत. आयुक्त फक्त बैठका घेतात पण पुढे काहीच होत नाही. महापौर हे कर्मचारी 50 वर्षांपासून पालिकेची सेवा करतात. या प्रलंबित प्रश्नांमुळे त्यांची चेष्टा केली जात आहे का? महापौर आपण स्वतः लक्ष घालून किमान या वर्षात तरी प्रश्न मार्गी लावा,अशी हात जोडून विनंती करतो.”

भाजप नगरसेवक संजय घुले यांनी तीच ‘री’ ओढत ”प्रभागात वर्षभरात एक ही अधिकारीही फिरकले नाहीत. कामे तर दूरच. पाण्याचा प्रश्न वीस वर्षात सुटला नाही. आपणही सोडवू शकलो नाही तर अवघड होईल,” या शब्दात नाराजी व्यक्त केली.