इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू – सुषमा स्वराज

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था 

इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटली असून 39 मृतदेहांचे 70 टक्के नमुने जुळले आहेत, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.

2014 मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेने 40 भारतीयांचं अपहरण केलं होतं. या 40 जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या 39 भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. अगोदर इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारने केला होता. तेंव्हा सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची भेटही घेतली होती. शिवाय 39 भारतीयांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी तेंव्हा दिले होते.

तर दहशतवाद्यांनी माझ्यासमोर या 39 जणांना मारलं, असा दावा या हरजीत मसीहने केला होता. अखेर या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आज सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत दिली.