उंदीर घोटाळा प्रकरणी धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

उंदीर घोटाळा प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कंपनीला उंदीर मारण्याचे कंत्राट दिले होते, ती कंपनीच अस्तित्वात नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

उंदीर मारण्याच्या कंत्राटामध्ये एक कंत्राट हे विनायक सहकार मजूर संस्थेच्या नावे आहे. या संस्थेने 17 हजार उंदीर मारल्याचा दावा आहे. पण, ज्यांनी ही संस्था सुरू केली, त्यांनाच ही संस्था कोण चालवतं हे माहीत नाही. अमोल शेडगे यांच्या नावावर ही संस्था स्थापन केली. मात्र आता अमोल शेडगेच हयात नाहीत. असं असताना अमोल शेडगे यांच्या खोट्या सह्या करून ही संस्था कार्यरत आहे. आनंद शेडगे यांनी आपले नातेवाईक वामन देवकर यांच्या सल्ल्याने 2002 साली विनायक सहकार मजूर संस्था स्थापन केली. 2004 साली संस्था रद्द झाल्याचं सांगितले असताना ही संस्था अजून कार्यरत असल्याचं समोर आलं. शेडगे कुटुंबीयांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली असता, मृत असलेला मुलगा अमोलच्या नावाने खोटी सही करून ही संस्था सुरू असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे.