कर्ज फेडण्यासाठी ठेकेदारानेच रचला आठ लाख रुपयांच्या लुटीचा बनाव

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन
वसई येथे कर्ज फेडण्यासाठी ठेकेदाराने रचलेला बनाव त्याच्या अंगलट आल्याची घटना घडली. मजुरांचे पगार करण्यासाठी बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीवरुन आलेल्या चार इसमांनी लुटून नेल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून घटनेचा तपास केला असता तक्रारदारानेच हा बनाव केल्याचे उघड झाले.
मोहम्म्द अली शेख (रा. वसई) असे लुटीचा बनाव करणा-या ठेकेदाराचे नाव आहे. शेख हा नॉर्थ कंस्ट्रक्शन कंपनीत ठेकेदार आहे. कामगारांचे पगार देण्यासाठी त्याने 17 फेब्रुवारीला बँकेतून आठ लाख रुपये काढले. घोडबंदर रस्त्यावर गायमुखजवळ दुचाकीवरुन आलेल्या चार इसमांनी त्याच्याकडे असलेली आठ लाखांची बॅग पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दिली.
गुन्हे अन्वेषण विभाग पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रनावरे यांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून तपास सुरु केला. तपासा दरम्यान त्यांनी त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु त्यांना अशी कोणतीच घटना घडल्याचे दिसून आले नाही. त्यांनी शेखला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. चौकशीमध्ये पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याने उलट सुलट दिली. पोलिसांना त्याचा संशय आला. हा बनाव दरम्यान आपणच केल्याची कबूली त्याने दिली.
शेख याच्यावर 24 लाख रुपये कर्ज आहे. हा बनाव करुन यातून मिळणारी रक्कम कर्ज फेडण्यासाठी उपयोगी पडेल या हेतूने त्याने हा बनाव केला. आठ लाखातून काही जणांची देणीही त्याने दिले असल्याचे तपासात उघड झाले आहे. कामगारांच्या पगाराचे पैसे देण्यासाठी नॉर्थ कंस्ट्रक्शनच्या मालकानेच त्याला ही रक्कम दिली होती. आधीचा लूटीचा गुन्हा रद्द होऊन शेख विरुद्धच फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.