कुणाल खेमूला मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन ई-चलन पाठवले!

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाऊंट सध्या विविध दमदार ट्वीट्समुळे कायम चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी आता बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूला ट्विटरवरुनच ई-चलन पाठवले आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याला ई-चलन पाठवले आहे.

कुणाल खेमू विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचा फोटो एका ट्विटर खात्यावर पोस्ट केला होता. या ट्वीटमध्ये त्याने मुंबई पोलिसांनाही नमूद केले. कुणालला ई-चलान मिळायलाच हवे, असे त्याने ट्वीटमध्ये लिहिले.

मुंबई पोलिसांनी याची दखल घेत, कुणाल खेमूला ई-चलन पाठवले. शिवाय चलानचा फोटोही ट्विटरवर शेअर केला. तुमच्या ट्वीटने आमच्या लक्षात आणून दिले. ई-चलन नंबर MTPCHC1800225825 संबंधिताला पाठवला आहे, असा पोलिसांच्या ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे.