कैद्यांनी चोपल्याने छिंदमला येरवड्यात हलविणार

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या अहमदनगरच्या उपमहापौर श्रीपाद छिंदम याला येरवडा कारागृहात शिफ्ट करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. छिंदमची कारागृहामध्ये रवानगी झाल्यानंतर कैद्यांनी त्याला चांगलचे चोपले होते. या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झाल्या आहेत.

छिंदम यांनी शिवाजी महाराजांबाबत कसे अपशब्द काढले याची एक ऑडिओ क्लिप शुक्रवारी व्हायरल झाली. यानंतर भाजपाने त्यांचा राजीनामा घेत पक्षातून हकालपट्टीही केली. त्यानंतर छिंदमना अटक करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम कारने पळून जात होते त्यावेळी सोलापूर रोड भागात असलेल्या शिवाराचाही आधार त्यांनी लपण्यासाठी घेतला. मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि पोलिसांना बोलावले. ज्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छिंदमना अटक केली.

शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी छिंदम यांच्याविरुद्ध अश्लील व अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संतप्त व तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहून छिंदम फरार झाले. मात्र लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.