ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एकाला अटक

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईन

ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवका गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणी ‘हिंदु युवा सेना’ संघटनेच्या संस्थापकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एसआयटीने शुक्रवारी करण्यात आली आहे. गौरी लंकेश यांचा सप्टेंबर २०१७ मध्ये हत्या करण्यात आली होती. तब्बल पाच महिन्यानंतर एसआयटीने पहिली अटक केली आहे.

के. टी. नवीनकुमार (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेशष विभागाला नवीनकुमार अवैधरित्या बंदुकांची कार्ट्रिज विकण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली होती. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून ३२ एमएमची १५ कार्ट्रिज जप्त केली होती. याचवेळी के. टी. नवीनकुमार याला या प्रकरणातील पहिला आरोपी मानण्यात आले होते.

के. टी. नवीनकुमार हा मुळचा कर्नाटकमधील मांड्या जिल्यातील असून सध्या चिकमगलूर येथे तो राहत आहे. नवीनकुमार हा ‘हिंदु युवा सेना’ या संघटनेचा संस्थापक आहे. एसआयटीने बंगळूरुच्या सत्र न्यायालयात नवीनकुमार विरोधात हत्येशी संबंधीत पुरावे मिळाल्याने सांगत त्याला ताब्यात घेतले होते. एसआयटीने कोर्टाला हे देखील सांगितले होते की, नवीनकुमार विरोधात अवैधरित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. यासाठी त्याला १८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले होते. के. टी. नवीनकुमार याच्या अटकेसाठी एसआयटीने पहिल्यांदा वॉरंटची मागणी केली होती.