धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये ड्युटीला गेले होते डॉक्टर, घरी परतल्यानंतर…

नगर : पोलीसनामा ऑनलाईन –डॉ. संदीप देठे कोविड सेंटरमध्ये ड्युटीला गेले असता कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर (ता पारनेर) येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी दुपारी 4 ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली.

सदर अपार्टमेंटमधील डॉ. संदीप देठे यांचा फ्लॅट बंद होता. ते खडकवाडी येथील आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहे. सोमवारी ते ड्युटी करून कर्जुले हर्या येथील कोविड सेंटरवर ड्युटीला गेले होते. त्यानंतर ते आपल्या फ्लॅटवर दुपारच्या सुमारास परतले. यानंतर पुन्हा सायंकाळी चारच्या सुमारास ते ग्रामीण रुग्णालय इथं ड्युटीसाठी निघून गेले. याचवेळी त्यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटातून 5 हजार रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पावणे 2 लाखांचा ऐवज चोरून नेला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देत कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.