पेटवून दिलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

वाकड : पोलीसनामा ऑनलाईन

घरगुती वादातून पेटवून दिलेल्या महिलेचा आज (शुक्रवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी दिली. खूनाच्या कलमात वाढ केलेला आरोपी नितीन एकनाथ सावंत हाही भाजला असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कांताबाई सावंत (५८, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संदीप हरिश्‍चंद्र सावंत (३७, रा. यश कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे भागवत गोरे यांच्या खोल्यांमध्ये सावंत परिवार भाड्याने राहते. काही दिवसांपूर्वी संदीप आणि त्यांचा चुलत-चुलत भाऊ नितीन यांच्यात वादावादी झाली होती. त्यावेळी संदीप याने त्याला मारहाण केली. याचा राग मनात धरुन संदीपची आई कांताबाई यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये कांताबाई गंभीररीत्या भाजल्या, तर नितीनही भाजला गेला. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असताना कांताबाई यांचा आज (शुक्रवारी) मृत्यू झाला. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.