पोलिसांच्या लेकींच्या नावे आता पाच हजार

सोलापूरः पोलीसनामा आॅनलाईन
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटूंबीयांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी अथवा महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बाळंतपणात पाच हजार रुपये व मुलीचा जन्म झाल्यास वेगळे पाच हजार रुपये नावे मिळणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयातील प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह यांनी दिली आहे. तसेच मुलींसाठी शैक्षणिक खर्च म्हणून दरवर्षी जुलै महिन्यात ५०० रुपयांची मदत शासनाकडून मिळणार अाहे. ही योजना चालू करण्यात आली असून, पोलीस वेल्फेअर विभागात अर्ज करून याचा लाभ सर्व पोलीस कर्मचारी घेऊ शकणार आहेत.

सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालायातील मैदानावर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या सहकार्याने स्पिरिच्युअल बाग तयार करण्यात अाली अाहे. त्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सिंह बोलत होते. हिंदुस्थान पेट्रोलियमचे मुख्य महाप्रबंधक कानरू श्रीनिवास, उपमहाप्रबंधक पी. सुंदरबाबू, मुख्य क्षेत्रीय प्रबंधक पी. रवींदर, पोलिस अायुक्त महादेव तांबडे, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक एच. एम. अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सोलापुरात पोलिस मुख्यालयात शुद्ध पाण्याची सोय केल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. पोलिस अधीक्षक प्रभू यांनी विविध योजनांची माहिती दिली. जीम व मोटारवाहन विभागाच्या नूतनीकरणाची सिंह यांनी पाहणी केली. शहर पोलिस मुख्यालय मैदानावर पोलिस पब्लिक स्कूल अाहे. सध्या अाठवीपर्यंत वर्ग अाहेत. त्यांची ताकद वाढवून बारावीपर्यंत वर्ग करण्यासाठी इमारत बांधकामासाठी निधी मिळावा, अशी मागणी आयुक्त तांबडे यांनी केली.
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने केलेल्या कामाचे सर्व स्तरातून काैतुक होत आहे.