पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचा ‘राष्ट्रपती पोलीस पदका’ने गौरव

मुंबई :पोलिसनामा ओनलाईन

पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना  कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या विविध पदकांचा ‘पदक प्रदान’ सोहळा बुधवारी पार पडला. कर्मचारी राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना प्रदान करण्यात आला.

पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचा ‘राष्ट्रपती पोलीस पदका’ने गौरव

या पोलीस पदक वितरणाचा ‘पदक समारंभ’ राज्यपालांच्या उपस्थितीत काल नरिमन पाँईंट येथील टाटा थिएटर येथे संपन्न झाला. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह‍ विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सध्या सेवेत असलेले सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त महादेव भीमराव तांबडे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदकाने’ गौरविण्यात आले. आयुक्त तांबडे हे १९९० सालापासून पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.

चंद्रपूर,अमरावती ,अहमदनगर असे अनुक्रमे ते १९९२ ते १९९७ दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी पदावर होते. त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी चे सहाय्यक पोलीस संचालक हे पदही भूषविले आहे. नाशिक आणि पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणूनही काम पहिले आहे. तसेच नागपूर राज्य राखीव दलात कमांडंट म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. कोल्हापूर , वाशीम तसेच पुणे सीआयडी चे अधीक्षक म्हणूनही त्यांनी सेवा बजावलेली आहे. तांबडे हे आता सोलापूर शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

त्यांना महाराष्ट्र तसेच केंद्राचे विविध पदक मिळालेले आहेत. केंद्राच्या ‘अंतर्गत सुरक्षा पदकाने’ त्यांना गौरविले आहे. महारष्ट्राचे ‘विशेष सेवा पदक’ही त्यांना प्राप्त झालेले आहे. तांबडे यांनी २८ वर्षाच्या सेवेत अनेक गुंतागुंतीच्या व कठीण गुन्ह्यांचा तपास लावला असून आरोपींना शिक्षा मिळण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी पोलीस दलातही अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविलेले आहेत. त्यांच्या पोलीस दलातील योगदानाचा यथोचित गौरव व्हावा म्हणून त्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदका’ने गौरविण्यात आले आहे.