प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अन्वय मधुकर नाईक यांची आईसह आत्महत्या

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन
अलिबाग मधील दिशा डायरेक्ट गृहनिर्माण प्रकल्पाचे भागीदारी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व आर्किटेक्ट अन्वय मधुकर नाईक (५४) आणि त्यांच्या आई कुमुद मधुकर नाईक (८४) यांचे मृतदेह त्यांच्या काविर गावांतील फार्महाऊस मध्ये शनिवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे म्हणाले की, अलिबाग जवळच्या कावीर या गावांत नाईक कुटुंबीयांचे फार्महाऊस असून मागील काही वर्षांपासून नाईक हे येथे राहत होते. शनिवारी सकाळी त्यांच्या घरी काम करणारी मोलकरीण आल्यावर मधुकर आणि कुमुद यांचे मृतदेह घरात आढळून आला. त्यानंतर त्यांच्या मोलकरणीने तातडीने पोलिसांना याची माहिती देताच. घटनास्थळी पाहणी केली असता. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आलेली आर्थिक मंदीतून झालेल्या आर्थिक दिवाळखोरीला वैतागून हा प्रकार घडला असावा असा अंदाज असून शनिवारी पहाटेच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली असावी. या घटनेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर नाईक कुटूंबियाचा जबाब घेण्याचे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.