बनावट नोटा चालविणारे बांगलादेशी रॅकेट राज्यात सक्रिय

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन
नोटाबंदी नंतर तरी बनावट नोटा प्रकरणाला आळा बसेल असे वाटत होते. मात्र ठाणे शहरातील वागळे इस्टेटमधील धर्मवीर परिसरात नव्या दोन हजार आणि ५०० रुपयांच्या तब्बल दोन लाख ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा खंडणीविरोधी पथकाने जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एकाला अटक झाली असून, या नोटा बांगलादेशातून झारखंडमार्गे ठाण्यात दाखल झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

याप्रकरणी प्रकाश प्रसाद ऊर्फ शंकर टोकल माहतो (४२, रा. झारखंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या तो महिन्यापासून तो या परिसरात राहत होता. २४ लाख रुपयांच्या बनावट नोटा तो विकणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन हजारच्या ११३, पाचशेच्या १०, शंभरच्या दोन बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यतील हेमलाल पंडित या मित्राकडून त्या विकत घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलीस आता हेमलालचा शोध घेत असून, त्याच्या अटकनेनंतर बनावट नोटा पुरविणारी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.