बांगलादेश क्रिकेट संघाच्या कर्णधारासह खेळाडूला दंड

दुबई:  टी-२० तिरंगी मालिकेतील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना वादग्रस्त ठरला. श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडल्याने या सामन्याला गालबोट लागले होते. या प्रकरणात आयसीसीने अंचारसंहितेचा भंग केल्याचे कारण देत बांगलादेश कर्णधार शाकिब अल हसन आणि आरक्षित खेळाडू नुरूल हसन यांना दंड ठोठावला आहे.

आयसीसीच्या अचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे या दोन्ही खेळाडूंना सामन्यातील २५ टक्के दंड आणि एक दोषगुण देण्यात आले. शाकिबने आयसीसी नियम २.१.१ चे उल्लंघन केले आहे, तर नुरूलने आयसीसी नियम २.१.२ चे उल्लंघन केले असल्याचे सिद्ध झाले आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या शुक्रवारच्या या निर्णायक सामन्यात बांगलादेशला विजयासाठी १२ धावांची गरज होती. तेव्हा वेगवान गोलंदाज उसुरु उडाना याने सलग दोन बाऊन्सर टाकले. पण पंचांनी नो बॉल दिले नाहीत. अखेरच्या षटकाचा पहिला चेंडू बाऊन्सर टाकण्यात आला. पण तो पंचाकडून वाईड देण्यात आला नाही. तसेच दुसराही चेंडू हा जास्त उसळी घेणारा होता. मुस्तफिजूर रहमान शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊन्सर असल्याने नो बॉल आहे, असे म्हणत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे सामना काही काळासाठी थांबविण्यात आला.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याला राग अनावर झाला. हसनने मैदानात खेळणाऱ्या मोहम्मद उल्लाह आणि रुबल हसन या दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. यावेळी वादाला तोंड फुटले आणि दोन्ही संघात राडा झाला. नंतर दोन्ही पंचानी मध्यस्थी केल्याने हा वाद शमला. नंतर बांगलादेशने लंकेवर विजय मिळवला. परंतु बांगलादेश संघ अशोभनीय वर्तवणुकीने टीकेचे लक्ष्य बनला.