बिबवेवाडीत टपरी हलवण्याची धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

“आपल्या पान टपरी जवळ असल्यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तुझी टपरी येथून हलव,”अशी धमकी देत सहा जणांनी दोघांना कोयत्याने व लोखंडी पाईपने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिबवेवाडी भागात अप्पर इंदिरानगरमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी किशन पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जमीर खान (वय 26, रा. बिबवेवाडी) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. मनसूर गूलाब नुरेवाले,यासीन बाशा मूल्ला,आशिफ गुलाब खाननुरेवाले,शाहरूख नामूद शेख,अत्तारखान, अकबरदाऊद शेख अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन पाठक यांची बिबवेवाडीतील श्रीजी लॉन्स समोर टपरी आहे. तर, यातील मन्सूर नुरेवाला याची पानटपरी त्यांच्या पानटपरीजवळ आहे. त्यामुळे त्याने फिर्यादी यांना काही दिवसांपुर्वी तुझी टपरी येथून हलव, तुझ्या टपरीमुळे माझा धंदा होत नाही, अशी धमकी दिली होती. मात्र, फिर्यादी यांनी त्यांची टपरी जागेवरून हलविली नाही. यामुळे तो इतर पाच जणांना घेऊन रविवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास टपरीजवळ आला. त्यावेळी शिवीगाळ करत त्यांनी फिर्यादी याना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना सोडविण्यासाठी त्यांचा मित्र जमीर यांनी मध्यस्थी केली तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या सर्वानी कोयते काढून खान यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच, लोखंडी पाईपने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक देवकाते हे करत आहेत.